पर्यटन

पर्यटन : -

पर्यटन ही संज्ञा प्रवास (Tour) या शब्दाशी संबंधित आहे आणि प्रवास (Tour) हा शब्द लॅटिन भाषेतील 'Tornos' या शब्दापासून आलेला आहे. Tornos शब्दाचा मूळ अर्थ 'वर्तुळ' किंवा 'वर्तुळाकार' असा आहे. याच शब्दापासून पुढे 'वर्तुळाकार प्रवास' किंवा पॅकेज टूर्स हा शब्द रुढ झाला.

एका व्यक्तीने किंवा व्यक्ती समूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मनोरंजनासाठी, अभ्यासासाठी, कामासाठी केलेला प्रवास म्हणजे पर्यटन होय.

मनोरंजन, फुरसत किंवा कामासाठी केलेला प्रवास म्हणजेच पर्यटन. जागतिक पर्यटन संस्था (World Tourism Organization) ही 'जे लोक प्रवास करून आपल्या परिसराबाहेरील जागी जाऊन सलग १ वर्षापेक्षा कमी काळ मनोरंजन, काम वा इतर कारणांसाठी रहातात ते' अशी पर्यटकांची व्याख्या करते.

पर्यटन हे फुरसतीचा वेळ घालविण्याचे एक साधन म्हणून जगभरात अतिशय लोकप्रिय झाले आहे. २००० च्या शतकाच्या अखेरीस आलेल्या जागतिक मंदीने व H1N1 फ्लूच्या साथीने २००८ च्या मध्यापासून ते २००९ च्या अखेरपर्यंत रोडावलेल्या पर्यटनाला परत बरे दिवस आले असून २०१२ मध्ये जागतिक पर्यटकांच्या संख्येने १०० कोटीचा पल्ला इतिहासात पहिल्यांदा ओलांडला. आंतरदेशीय पर्यटन उत्पन्न (आंतरदेशीय देणे जमाखात्यातले पर्यटनावरचे उपखाते) २०११त १.०३ लाख कोटी अमेरिकन डॉलर (७४ हजार कोटी युरो) इतके वाढले. ते २०१० च्या तुलनेत ३.८% अधिक होते. २०१२त चीन जगातील पर्यटनावर सर्वात जास्त खर्च करणारा देश बनला आणि त्याने अमेरिका व जर्मनी यांना त्याबाबतीत मागे टाकले. चीन व उदयोन्मुख राष्ट्रे (रशिया व ब्राझील ठळकपणे) ह्यांचा पर्यटनावरचा खर्च गेल्या दशकात लक्षणीय वाढला आहे.

इतिहास[संपादन]

अतिप्राचीन काळापासून प्रवास ही मनुष्यप्राण्याची सहज प्रवृत्ती आहे. प्राचीन काळातील प्रवासाच्या पद्धती व संकल्पना या आजच्या काळातील प्रवास पद्धती व संकल्पना यापेक्षा वेगळया आहेत. प्राचीन काळी प्रवासाचा उद्देश नवीन प्रदेशचा शोध घेणे, व्यापार करणे व धार्मिक स्थळांना भेट देणे हा होता. हे प्रवासी व व्यापारी विविध भूप्रदेश, देश व राज्यातून प्रवास करत असत. त्यामुळे विविध राज्यांच्या राजधान्या, शहरे, बंदरे, बाजारपेठांची केंद्रे, व्यापारी मार्ग यांचा त्यांच्याषी संबंध येत असे. हा प्रवास व व्यापार यांतून विविध मानवी समूह, संस्कृती यांची परस्पर ओळख झाली. अनेक गोष्टीची देवाण घेवाण झाली. एकमेकांच्या समाजजीवनाचे आकलन झाले. प्रवास व पर्यटनाच्या वाढीसाठी या बाबी अनुकूल ठरल्या. मध्ययुगात व्यापाÚयांच्या प्रवासाच्या पद्धतीत बदल झाले. आनंद मिळविण्यासाठी, मनोरंजनासाठी प्रवास ही संकल्पना प्रथम युरोपातील रोमन लोकांनी रूजवली. रोमन साम्राज्याच्या काळात तेथील लोक इजिप्तमधील पिरॅमिड्स, ग्रीसमधील अथेन्स व स्मार्टा या नगरांची भव्य नगररचना, तेथील देव देवतांची मंदिरे, मूर्ती, तेथील क्रीडांगणे पाहण्यासाठी जात. पुढे युरोपमधील पुनरूज्जीवनामुळे जगभरातील वसाहतींचा व साम्राज्याचा विस्तार, औद्योगिक क्रांती व यातून युरोपमध्ये सुरू झालेला संपत्तीचा ओघ यांमुळे तेथे पर्यटनही श्रीमंतांची मक्तेदारी न राहता मध्यम वर्गसुद्धा पर्यटनात सहभागी झाला. त्यात धर्मप्रसारक, विद्वान, लेखक, कवी व व्यापारी यांचा समावेश होता. युरोपियन पर्यटकांनी आधुनिक पर्यटनाचा पाया घातला.

पर्यटनाचे महत्त्व -
 
1 आर्थिक प्रगती - पर्यटन उद्योगमुळे  परकीय मुद्रेचा साठा करण्यात मदत मिळते.त्यामुळे आपल्या देशाला परकीय चलन उत्पन्न करण्यास मदत मिळते.दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक भारत आणि इतर ठिकाणांना भेट देतात.ते वेगवेगळ्या ठिकाणी जातात तेथे राहतात आणि तिथल्या दुकानात खरेदी करतात.या सर्व गोष्टी परदेशी मुद्रेसाठी किंवा चलनासाठी महत्त्वपूर्ण योगदान देते.वैश्विक मंदी असून देखील पर्यटनामध्ये टक्केवारी वाढ झाली आहे.
 
2  उत्पन्नाचा स्त्रोत - पर्यटन हे सार्वजनिक आणि खाजगी उत्पन्नाचे निरंतर  स्त्रोत आहे. सरकारने विविध प्रकारचे कर लावले आहे याला सरकारी महसूल म्हणतात या करांद्वारे मिळविलेले उत्पन्न हे सार्वजनिक उत्पन्न आहे.जे विक्रेता स्थानिक वस्तुंनी नफा मिळवतो त्याला वैयक्तिक उत्पन्न म्हणतात.पर्यटन रोजगार निर्मित मध्ये देखील मदत करतो. यामुळे हॉटेल उद्योग,आतिथ्य उद्योग,सेवा क्षेत्र ,करमणूक,आणि परिवहन उद्योगात रोजगाराची संधी मिळाली.
 
3 इंफ्रास्ट्रक्चर चा विकास - आपण कधी या कडे लक्ष दिले आहे का की,एखाद्या ठिकाणाला जेव्हा पर्यटन स्थळ घोषित केले जाते तेव्हा त्या ठिकाणचे  लक्षणीय परिवर्तन होते.पर्यटन हे धरणं,रस्ते, कनेक्टिव्हिटी, विमानतळ सुधारणे आणि पर्यटकांना एखाद्या ठिकाणी चांगल्या प्रकारे भेट देण्यास मदत करते .या मुळे पर्यटनाचा इन्फ्रास्ट्रक्चर चा विकास होण्यास  मदत मिळते.
 
4 सामाजिक प्रगती - सांस्कृतिक देवाणघेवाण करण्यासाठी पर्यटन हा एक उत्तम मार्ग आहे. हे नवीन प्रगतीपथावर भेट देताना पर्यटक एकमेकांना आदर, सहिष्णुता आणि प्रेम दर्शविणे शिकवते त्यामुळे हे  सामाजिक प्रगतीस प्रोत्साहित करते.
 
5 सांस्कृतिक वारसा- पर्यटन आपल्या देशातील सौंदर्य, कला, इतिहास आणि संस्कृती दर्शविण्यास मदत करते.कोणत्याही देशातून येणारे वेगवेगळे लोक त्यांच्या सह सुंदर आणि सांस्कृतिक संकल्पना घेऊन येतात.आणि त्या संकल्पना वेगवेगळ्या ठिकाणी पसरवतात.अशा प्रकारे स्थानिक कौशल्यता,भाषा आणि कलेला पर्यटनामुळे वाव मिळतो.आणि सांस्कृतिक वारसा जपला जातो.
 
निष्कर्ष - पर्यटन देशात येणाऱ्या पर्यटकांना आपल्या कडे आकर्षित करतो. तसेच येण्याचे निमंत्रण देखील देतो.हे आपल्या देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये मदत करतो.रोजगाराची निर्मिती करतो.
 
पर्यटन हे सांस्कृतिक देवाणघेवाणसाठी एक उत्तम मार्ग आहे.म्हणून देशाच्या पर्यटनाला प्रोत्साहित केले पाहिजे.कारण पर्यटन जगातील सौंदर्याला शोधण्याची सुविधा मिळवून देतो.

फुरसतीच्या पर्यटनाचा उदय

पर्यटन म्हणजे दैनंदिन प्रवासाव्यतिरिक्त किंवा कामाव्यतिरिक्त केलेला प्रवास.

कामातून सुट्टी मिळाली की त्यानुसार आनंद, मौज करीत निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी केलेले नियोजनबद्ध पर्यटन म्हणजे फुरसतीचे पर्यटन होय.

समुद्री पर्यटन



माणसाला सागरी सफरींची पूर्वी पासून आवड होती, अगदीच पोहण्यापासून ते व्यापरापर्यंतच्या सर्व गोष्टी या सागरामुळे शक्य झाल्या. समुद्र किनारे, बंदरे, सागर सफरी या मुळे समुद्री पर्यटनाचा विकास झाला, टायटॅनिक जहाजामधे जगातील पहिली सागर सफर निघाली, आत्ता आधुनिक काळात छोट्या छोट्या बोटींद्वारे तसेच मोठ्या मोठ्या जहाजांद्वरे देखील समुद्राचे विराट सौंदर्य पहावयास मिळते. तसेच समुद्राच्या गर्भाबद्दल देखील माणसाचे पूर्वीपासून आकर्षण राहिले आहे. त्यातील विविध जीवसृष्टी, जलचर, शैवाल, वनस्पती या पाहण्यासाठी समुद्र पर्यटन वाढवले गेले आहे, शिवाय वॉटरप्रुफ टेक्निक्सचा वापर करून पाण्यात देखील घरे बांधली जात आहेत, त्यात राहण्याचा निराळा आनंद माणूस उपभोगत आहे.

आधुनिक पर्यटन



उद्देश : १. पर्यावरण जतन २. पुरातन वस्तूंची हानी न करणे

हिवाळी पर्यटन


भारतीय पर्यटनाचा इतिहास हा हजारो वर्षो जुना आहे. हजारो वर्षापासून भारतीय उपखंडात लोक तीर्थक्षेत्रIन्ना भेट देण्याकरीता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत आलेत. भारतीय ग्रंथात सुद्धा याचे पुरावे भेटतात ज्यात, पंढरीची वारी, कुंभमेळा यांचे संदर्भ वाचण्यास मिळतात. तसेच इंग्रजांनी जेव्हा भारतावर राज्य केले तेंव्हा त्यांचा दोन राजधानी असत, हिवाळी राजधानी आणि उन्हाळी राजधानी. इंग्रज उन्हाळ्यात महाबळेश्वरला, शिमला, कश्मीर, उटी, म्हेसूर अशा ठिकाणी राहाण पसंत करत. इंग्रज हे राज्यकर्ते होते आणि त्यांचाकडे कामासाठी किवां निगराणी साठी भारतातील काही राजे महाराजे किवा अधिकारी होते, ज्यांना कामानिम्मित इंग्रजांचा माघे त्या त्या ठिकाणी जावे लागे. भारताला स्वातंत्र्य मिळाले इंग्रज हा देश सोडून गेले पण त्यांचा मागे येथील श्रीमंत घराणे आणि राजे महाराजे यांना मात्र अशा फिरण्याची चटक लागली आणि स्वतंत्र भारतात फिरण्याची वेगवेगळे प्रदेश बघण्याची इच्छा तर प्रत्येक सामान्य माणसाला होती ती या लोकांना बघून उदयास आली आणि अशा प्रकारे आधुनिक भारता मध्ये हिवाळी पर्यटन उदयास आले.

धार्मिक पर्यटन



माणसाची श्रद्धा भक्तिभाव देखील पर्यटनास कारणीभूत ठरतो,शिवाय प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा धर्म, स्वतःची संस्कृती प्रिय असते. त्यामुळे सांस्कृतिक-धार्मिक पर्यटनाचा विकास होतो, भारतासारख्या राष्ट्रामध्ये धार्मिक पर्यटन हे अधिक प्रमाणात असलेले दिसते,भारतात २ लाखाच्या वर मंदिरे ,३ लाख मशिदी, १०,७०१ चर्च हे अस्तित्वात असलेले दिसतात, शिवाय इतर धर्माशी निगडित, हजारो ठिकाणे असलेली दिसतात, ज्यातून लक्षावधी यात्रा,उरूस,मिरवणुका निघत असलेल्या कळतील, शिवाय विविध धर्मामध्ये असलेल्या विविध प्रथांमुळे देखील लक्षावधी वस्तूंची विक्री होत असलेली दिसून येते, ज्यामुळे साधारण लोकांना रोजगाराची संधी निर्माण झालेली दिसते. कित्येक भागातून तीर्थयात्रा करायला लोक निघतात,कित्येक लोक उरूस-जत्रा करतात, चार धाम यात्रा असते, शिवाय सणासुदीच्या दिवशी लोकांची अशा स्थळांवर जास्त रेलचेल होते, ज्यातून परिवहनाला देखील चालना मिळते, लोकांचे भ्रमंती करून मनोरंजन होते शिवाय समाधान देखील मिळते, म्हणून धार्मिक पर्यटन देखील पर्यटन विकासात महत्वाचे योगदान देत असलेले दिसून येते.

आरोग्य पर्यटन


आरोग्य पर्यटनात पर्यटक आल्हाददायक स्वच्छ हवामानात आपल्या प्रकृतीत सुधारणा करण्यासाठी अथवा आहे तशीच ठेवण्याचा प्रयत्‍न करतो. पूर्वी यालाच हवापालट असे म्हणत. लोकमान्य टिळक अशाच कारणासाठी सिंहगडावर जाऊन रहात.

प्रदूषणमुक्त व आल्हाददायक वातावरण व जोडीला निसर्गसौंदर्य असल्यास आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो, म्हणूनच स्थानिक पर्यटनात पर्यटक जवळच्या शांत निसर्ग संपन्न व सौंदर्याने नटलेल्या परिसरात हवापालटासाठी जातात. अशा पर्यटनात पर्यटक एका आठवड्यापासून ते तीन महिन्यापर्यंत वास्तव्य करतात. उदा० महाबळेश्वर, माथेरान, चिखलदरा, वाई, पाचगणी, इत्यादी गावी जाऊन राहणे.

शैक्षणिक पर्यटन


शैक्षणिक पर्यटन म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी केलेला प्रवास होय.यामध्ये शैक्षणिक सहली,शैक्षणिक परिषद किंवा संशोधनासाठी देशामध्ये किंवा देशाबाहेर केलेला प्रवास यांचा समावेश होतो.विद्यार्थ्यांच्या दृष्टीने या पर्यटनाला जास्त महत्त्व आहे कारण क्षेत्र अभ्यास केल्यामुळे वेगवेगळ्या संकल्पना समजण्यास मदत होते.

इतर पर्यटन प्रकार


एकल पर्यटन ही संकल्पना पश्चिमात्य देशात लोकप्रिय आहे.एकट्याने थोडक्या साहित्यानिशी पर्यटनाला बाहेर पडणे,पर्यटनाचे नियोजन करून अथवा न करता लवचिक धोरणानुसार ठिकठिकाणी पर्यटन करणे.ही प्रमुख संकल्पना या मागे असते.शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी किंवा व्यवसाय करण्या आधी काही काळाचा विश्राम घेऊन तरुण-तरुणी एकट्याने पर्यटनासाठी बाहेर पडतात.या मध्ये अनेक भले-बुरे अनुभव येतात,व जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन विस्तृत होतो.भारतातही हल्ली या प्रकारचे पर्यटन करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.

पर्यटनातून आर्थिक समृद्धी

स्थानिक संस्कृती जोपासताना, स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन आणि आर्थिक पातळी उंचावण्यासाठी पर्यटन

ज्यांनी आपल्या देशातील फक्त पर्यटनस्थळं विकसित केल्यामुळे त्या देशातील आर्थिक प्रगतीची चाकं फिरू लागली असे आज आपण अनेक देश पाहतो. सिंगापूर हे त्यातलंच एक उदाहरण. जिथे पर्यटन­विकास होऊ शकतो अशी महाराष्ट्रात अनेक स्थळं आहेत. या ऐतिहासिक, निसर्ग­ सौंदर्यानं नटलेल्या क्षेत्रांचा विकास आपण करायला हवा. इथल्या पर्यटनातून स्थानिक उद्योजक घडले पाहिजेत, स्थानिकांना आर्थिक उत्पन्नाचं एक साधन मिळालं पाहिजे. असं करत गेलो तर आपली संस्कृती टिकेल, जोपासली जाईल.

आर्थिक दृष्टिकोन : आर्थिक दृष्टिकोनातून पर्यटन उद्योग महत्त्वाचा ठरतो. पर्यटन उद्योगमुळे सेवाउद्योगांना महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले. वस्तू, त्यांचे उत्पादन, वितरण व सेवन हेच दीर्घकाळ आर्थिक विश्लेषणाचे प्रमुख चर्चाविषय होते आणि परिणामी सेवाउद्योगांकडे दुर्लक्ष झाले होते. पर्यटनाच्या योगे देशांत-परदेशांत होणारी माणसांची वाढती वर्दळ व हालचाल ह्यांमुळे सेवाक्षेत्राला एकूण उत्पादनाच्या वर्तुळात महत्त्वाचे स्थान प्राप्त होऊ लागले. पर्यटनामुळे व्यापाराचे प्रमाण व परिणाम यांचा विस्तार झाला. हिमाच्छादित पर्वतशिखरे, निर्मनुष्य समुद्रकिनारा, निर्मनुष्य वनप्रदेश या उपेक्षणीय गोष्टी पर्यटनक्षेत्रात येऊ लागल्या व त्या प्रथम दर्जाच्या आर्थिक मत्ता ठरल्या.

पर्यटनामुळे जो प्रत्यक्ष पैसा मिळतो, त्याहीपेक्षा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये गुणक परिणामामुळे जी भर पडते किंवा पर्यटक खर्चाच्या उलाढालींमुळे निर्माण होणाऱ्‍या पैशाची जी भर पडते, तिचे महत्त्व अधिक असते. याचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे करता येईल : पर्यटनावर पैशाचा जो प्रत्येक एकक खर्च होत असतो, तो सबंध अर्थव्यवस्थेत फिरत राहतो आणि त्यायोगे त्याच्याशी ज्या ज्या लोकांचा संबंध येत राहतो, त्यांचा वाढीव प्रमाणात फायदा होत राहतो. अर्थशास्त्रज्ञांनी पर्यटनाचा गुणक परिणाम भारताच्या बाबतीत ३·५ एवढा काढला आहे. सोप्या शब्दांत सांगायचे तर, एका पर्यटकाचा एक रुपया खर्च झाल्यास, त्यायोगे अर्थव्यवस्थेमध्ये ३·५ रुपये किंमतीची उलाढाल होते.

आंतरराष्ट्रीय पर्यटनाप्रमाणेच अंतर्गत पर्यटनाचाही देशाच्या आर्थिक स्थितीवर अनुकूल परिणाम होत असतो. मात्र याबाबतची आकडेवारी आंतरराष्ट्रीय पर्यटनाप्रमाणे सुलभपणे मिळू शकत नाही. ढोबळ अंदाजाप्रमाणे अंतर्गत पर्यटनामुळे जी आर्थिक उलाढाल निर्माण होते, ती आंतरराष्ट्रीय पर्यटनामुळे निर्माण होणाऱ्‍या उलाढालीच्या दसपटींनी अधिक असते.

पर्यटनामुळे होणारा आणखी एक अतिशय महत्त्वाचा लाभ म्हणजे मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्‍या रोजगारसंधी. पर्यटन हा श्रमप्रधान सेवाउद्योग असल्यामुळे आणि विकसनशील देशांमध्ये मोठ्या संख्येने श्रमिकांची उपलब्धता असल्याने, पर्यटनउद्योगाचा विकास बेकारी व अर्धरोजगारी या समस्यांचे काही प्रमाणात निराकरण करू शकतो.

पर्यटन क्षेत्रातील रोजगारक्षमतेचा आणखी एक फायदा रोजगाराचे विविधांगी स्वरूप हा होय. लहानमोठ्या वयोगटांतील माणसे, शिक्षित व अशिक्षित, कुशल व अकुशल, नागरी व ग्रामीण अशा प्रकारच्या लोकांना पर्यटनामुळे रोजगार मिळू शकतो. उदा., पर्यटन-प्रतिनिधी (एजंट), सहल-संयोजक, मार्गदर्शक किंवा वाटाड्या, हॉटेल-व्यवस्थापक, स्वागतकार, कारकून, हिशेबनीस, आचारी व त्यांचे साहाय्यक, मनोरंजनकार, जाहिरातदार, छायाचित्रकार, पुष्परचनाकार, सुशोभनकार, हमाल इत्यादी. स्पेनमध्ये कामकरी लोकसंख्येच्या ८% लोक व स्वित्झर्लंड या ६२·९७ लक्ष लोकसंख्येच्या छोट्या देशातील कामकरी लोकांपैकी ५% लोक पर्यटन उद्योगात गुंतलेले आहेत. स्पेन, हाँगकाँग, बहामा, थायलंड यांसारखे देश तर आपल्या अर्थव्यवस्था या उद्योगाभोवतीच गुंफण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतात.

बनारसचा सुप्रसिद्ध घाट
बनारसचा सुप्रसिद्ध घाट

पर्यटन उद्योगांपासून मिळणारा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे खास देशी बनावटीच्या हस्तकलात्मक वस्तू बनविणाऱ्‍या लघुउद्योगांच्या व कुटिरोद्योगांच्या विकासास मिळणारे उत्तेजन. विशेषतः विकसनशील राष्ट्रांनी पर्यटन उद्योगाच्या गरजानुकूल असे आपल्या हस्तोद्योगाचे उत्पादनविषयक धोरण ठेवले, तर ते फायदेशीर ठरते. परिणामतः देशाच्या सर्व भागांचा समतोल विकास साधण्याचे कार्यही पर्यटनामुळे सुलभ होऊ शकते.

काझीरंगा (आसाम) अभयारण्यातील फेरफटका
काझीरंगा (आसाम) अभयारण्यातील फेरफटका

पर्यटन हा एक असा उद्योग आहे, की ज्याच्यायोगे प्रगत व समृद्ध राष्ट्रांकडून अधिकतर झालेली सर्व प्रकारची साधनसामग्री विकसनशील राष्ट्रांकडे संक्रमित होऊ शकते. परदेशी पर्यटकांना आकृष्ट करून घेण्याची स्पर्धा सर्व देशांत चालू असते. भारताच्या एकषष्ठांश क्षेत्रफळ असलेल्या स्पेन सारख्या चिमुकल्या राष्ट्राने १९७३ मध्ये पर्यटन उद्योगाची कास धरून २६१ कोटी डॉ. (१,९५० कोटी रुपये) एवढे परदेशी चलन मिळविले. ही रक्कम म्हणजे त्या देशाला मिळणाऱ्‍या एकूण परदेशी चलनाच्या ४० टक्के होती. पर्यटन उद्योग ज्या देशांनी मोठ्या प्रमाणावर विकसित केला आहे, अशा ग्रीस, आयर्लंड, पोर्तुगाल, यूगोस्लाव्हिया, तुर्कस्तान यांना त्या उद्योगावाटे मिळालेला परदेशी चलनाचा वाटा १९७३ मध्ये अनुक्रमे २१·३%, १७·५%, १६·९%, १४·१% व ६·४% होता. यांच्या तुलनेने भारताचा वाटा अत्यल्प म्हणजे केवळ ०·२५% एवढाच आहे

सांस्कृतिक दृष्टिकोन : आर्थिक लाभांखेरीज पर्यटनाच्या योगे विविध देशांतील भिन्नभिन्न लोक एकत्र येऊ शकतात व एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकतात. तणावांनी भरलेल्या सध्याच्या जगामध्ये आंतरराष्ट्रीय सदिच्छा व सामंजस्य यांचे वर्धन करण्याच्या कामी  आंतरराष्ट्रीय पर्यटनाचा बहुमोल उपयोग होतो. देशांतर्गत पर्यटनासही हीच गोष्ट लागू आहे. भाषा आणि चालीरीती यांचे वैविध्य असलेल्या भारतासारख्या खंडप्राय देशात पर्यटन हे राष्ट्रीय एकात्मता साधण्याचे प्रभावी साधन होय. 

आंतरराष्ट्रीय पर्यटन उद्योग : १९५० नंतरच्या काळात आंतरराष्ट्रीय पर्यटन उद्योग वेगाने विकसित झाला. १९७३ पर्यंत या उद्योगाची गुंतवणूक ३,७०० कोटी रु. होती व त्यात २० कोटी लोकांना रोजगार उपलब्ध होता. तथापि तेलाच्या किंमतींमध्ये अतिशय चढी वाढ झाल्याने उलाढालीच्या संदर्भात हा उद्योग तेलउद्योगानंतरचा दुसऱ्‍या क्रमाकांचा उद्योग ठरला आहे. तरीही सबंध जगामध्ये कमाल रोजगार उपलब्ध करून देणारा एकमेव उद्योग म्हणून त्याचा पहिला क्रमांक चुकलेला नाही.

विदेशी पर्यटकांना आकृष्ट करण्याचा हेतू हा केंद्रबिंदू समजून पर्यटनसुविधांच्या विकासाकरिता सरकारी पैसा खर्च करण्यासाठी जगातील प्रत्येक राष्ट्र प्रयत्नशील आहे. काही राष्ट्रांमध्ये या कार्यासाठी एक शासकीय विभागच स्थापण्यात येतो. उदा., इटलीमध्ये ‘एन्ते नॅझिओनेल इतालिआनो तूरिझम’ (एनिट) हा विभाग पर्यटनाला चालना देण्यासाठी १९१९ मध्ये स्थापण्यात आला. सोव्हिएट रशियामधील ‘इन्टूरिस्ट’ (स्था. १९२९) किंवा फ्रान्समधील ‘कमिसारिएत जनरल ऑफ तूरिझम’ (१९२८) हा विभाग सार्वजनिक बांधकामखात्याच्या अखत्याराखाली उभारण्यात आला. इतर काही देशांत पर्यटनकार्यास चालना देण्याकरिता निमशासकीय किंवा ऐच्छिक संघटना उभारण्यात आल्या असून, त्यांना केंद्र शासनाकडून आर्थिक अनुदान दिले जाते. चेकोस्लोव्हाकियाची ‘सेडॉक’ ही संघटना, डेन्मार्कचे ‘डॅनिश टूरिस्ट बोर्ड’, पूर्व जर्मनीचे ‘स्टेट ट्रॅव्हल ब्यूरो’, ग्रीसची ‘नॅशनल टूरिस्ट ऑर्गनायझेशन’, बल्गेरियाचे ‘बाल्कनटूरिस्ट’ (१९४८), ग्रेट ब्रिटनची ‘ब्रिटिश टूरिस्ट ऑथॉरिटी’ ही यांची काही उदाहरणे होत. या संस्था विदेशी पर्यटकांना आकृष्ट करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करतात. त्यांमध्ये जाहिराती, पुस्तिका, पोस्टर, परिपत्रके इत्यादींद्वारा प्रसिद्धी ‘पर्यटक परिचय सेवा’ या विभागाची स्थापना स्थानिक उत्सव, जत्रा-प्रदर्शने यांचे संयोजन प्रवेशपत्राच्या दरांत कपात इत्यादींचा समावेश होतो.

आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या संवर्धनासाठी व उत्तेजनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध पर्यटनसंस्था आणि संघटना कार्य करताना आढळतात : (१) ‘इंटरनॅशनल टूरिंग अलायन्स’ (आयटीए) ही जिनीव्हामध्ये १८९८ साली स्थापलेली संघटना (सध्याचे नाव १९१९ मध्ये बदलण्यात आले.) आंतरराष्ट्रीय पर्यटनविषयक सर्व समस्यांचा अभ्यास करणे, त्यांबाबत सुधारणा सुचविणे, पर्यटनास चालना व प्रोत्साहन देण्याबाबत प्रयत्नशील राहणे आणि विविध देशोदेशींच्या पर्यटनसंस्था-संघटनांच्या हितसंबंधांचे रक्षण करणे इ. कार्ये करते. ही संस्था पर्यटनविषयक सूक्ष्मसंदर्भकेंद्र चालविते आणि नकाशे, हॉटेले, निवासालये इत्यादींविषयी मार्गदर्शक पुस्तिकाही प्रसिद्ध करते. ८० देशांतील ३०० लक्षांवरील सभासदांच्या १८० संघटना या संस्थेच्या सदस्य आहेत. (२) ‘यूरोपियन ट्रॅव्हल कमिशन’ (इटीसी) हा आयोग डब्लिन येथे १९४९ मध्ये स्थापन झाला असून यूरोपांतर्गत व यूरोपबाहेर अशा दुहेरी पर्यटनास उत्तेजन देणे, सहकार्यवर्धन व माहितीविनिमय तसेच संशोधन करणे ही या आयोगाची प्रमुख उद्दिष्टे असून, २३ यूरोपीय देशांच्या राष्ट्रीय पर्यटक संघटना या आयोगाच्या सदस्य आहेत. (३) ‘वर्ल्ड असोसिएशन ऑफ ट्रॅव्हल एजन्सीज’ (वॉटा) ही संस्थादेखील जिनीव्हातच १९४९ मध्ये स्थापन झाली. आंतरराष्ट्रीय पर्यटनविकासासाठी प्रयत्न करणे, सर्व देशांतील पर्यटन संघटनांची सुसूत्र उभारणी करण्याबाबत साहाय्य व सहकार्य देणे, पर्यटनविषयक माहिती संकलित करून ती सर्वत्र प्रसृत करणे, तसेच पर्यटनास उत्तेजन मिळेल अशा सर्व व्यापारी व आर्थिक कार्यांमध्ये (उदा., जत्रा, प्रदर्शने वगैरे) आपला सहभाग देणे ही या संस्थेची प्रमुख उद्दिष्टे असून, ८७ देशांतील पर्यटन संघटनांना या संस्थेच्या सेवा उपलब्ध केल्या जातात. (४) ‘वर्ल्ड टूरिझम ऑर्गनायझेशन’ (डब्ल्यूटीओ) या संघटनेची माद्रिद (स्पेन) येथे १९७४ मध्ये स्थापना झाली असून राष्ट्रीय पर्यटनसंस्था-संघटनांचे पारस्परिक सहकार्य व पर्यटनविषयक समस्यांचा अभ्यास, सदस्य राष्ट्रांमधील पर्यटन सुकर करणे व त्यात अधिकाधिक सुधारणा करणे ही या संघटनेची उद्दिष्टे आहेत. ११५ देश व ८९ संघटना डब्ल्यूटीओच्या सदस्य आहेत. वर्ल्ड ट्रॅव्हल, इंटरनॅशनल ट्रॅव्हल स्टॅटिस्टिक्स, ट्रॅव्हल ॲब्रॉड वगैरे तिची प्रकाशने आहेत. या संघटनेची पहिली सभा एप्रिल १९७५ मध्ये माद्रिद येथे भरली. भारत हा या संघटनेच्या कार्यकारी समितीचा सदस्य आहे. (५) ‘साउथ एशिया रीजनल ट्रॅव्हल कमिशन’ या आयोगाचा भारत एक सदस्य असून या विभागातील सर्व देश या आयोगावर प्रतिनिधित्व करतात. १९७५ मध्ये भारताला या आयोगाचे अध्यक्षपद मिळाले. (६) ‘पॅसिफिक एरिया ट्रॅव्हल असोशिएशन’ (पॅटा) ही संघटना उत्तर अमेरिकेपासून पॅसिफिक प्रदेशापर्यंतच्या पर्यटनास प्रोत्साहन देण्याकरिता १९५२ मध्ये सॅन फ्रॅन्सिस्को येथे स्थापण्यात आली. भारत हा या संघटनेचा सदस्य आहे. पॅटा विपणन व जाहिरातविषयक सेवा आपल्या सदस्यांना उपलब्ध करते. या संघटनेने सदस्यदेशांच्या वतीने अनेक सर्वेक्षण व संशोधन प्रकल्प पार पाडले आहेत. १९६४ पासून भारत पॅटाचा पूर्ण सदस्य आहे. लंडन व मॅनिला येथे पॅटाची विभागीय कार्यालये असून ६३ देशांमधील १,५०० संघटना तिच्या सदस्य आहेत. पॅसिफिक ट्रॅव्हल न्यूज हे नियकालिक पॅटातर्फे प्रसिद्ध करण्यात येते.


भव्य बादामी लेणी
भव्य बादामी लेणी

भारत : भारत १९६० च्या सुमारास पर्यटन उद्योगास विशेष चालना मिळाली. भारतात यात्रा वा सहली यांच्या विकासाला चालना देणारे घटक पुढीलप्रमाणे आहेत: (१) मध्यमवर्गातील बऱ्‍याच लोकांच्या मालकीच्या मोटारगाड्यांवरून लोकांचे उत्पन्न वा प्राप्ती यांमध्ये झालेली वाढ विशेषपणे प्रकट होते. (२) वर्षाकाठी तीन आठवडे वा त्यांपेक्षा अधिक काळ अर्जित रजा उपलब्ध झाल्याने आणि प्रदीर्घ काळ नोकरीनंतर मिळणाऱ्‍या रजेमुळे लोकांना आराम करावासा वाटू लागला. (३) देशभरच्या नवनवीन विकासप्रकल्पांबद्दल वाटणारे कुतूहल अथवा औत्सुक्य. (४) चांगले रस्ते, अधिक कार्यक्षमतेने धावणारी वाहने, चांगली निवासालये आणि गतिमान प्रवास जंबो जेट विमानांमुळे त्यामध्ये आलेली अधिक गतिमानता.

प्रवास जसजसा अधिक वेगवान, अधिक सुरक्षित आणि जनसामान्यांच्या पातळीपर्यंत येऊन ठेपला, तसतसे खुद्द प्रवासानुभवांवरून पर्यटनाचे मोठ्या प्रमाणावरील सुसंघटित अशा व्यवसायात रूपांतर होऊ लागले. विविध प्रवासी संघटना एकाच प्रकारच्या सुविधा आणि सरसकट सहली (समूह-सहली) (पॅकेज टूर) आयोजित करू लागल्या. परिणामी त्या सर्वांमध्ये तीव्र स्पर्धाही सुरू झाली.

भारतामध्ये नैसर्गिक, वास्तुकलाविषयक व ऐतिहासिक साधनसंपत्तीचे इतके वैपुल्य व विविधता आहे की, त्या विदेशी पर्यटकांना आकृष्ट करून घेतील अशा नीटसपणे व सुबकपणे मांडण्याच्या व पुढे अधिकाधिक विकसित करण्याच्या कलेवर भर देणे महत्त्वाचे ठरेल.भारतीय पर्यटन उद्योगाचा विकास खालील तीन प्रकारांनी करण्यात आला, तर आंतरराष्ट्रीय पर्यटनामध्येही भारताला वरचे स्थान मिळविणे शक्य होईल. ते तीन मार्ग असे: (१) पर्यटनस्थळांचा विकास, (२) अध:संरचनात्मक सुविधांची निर्मिती व वाढ आणि (३) विपणन प्रयत्न.

अल्पकालीन उपाय म्हणून ज्या पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचा प्रवाह वाहतो आहे, त्या स्थळांच्या विकासावर अगोदर लक्ष केंद्रित करणे आवश्यक ठरते. यामुळे भविष्यकाळात पर्यटनस्थळांबाबत अधिक निर्धाराने विकास कार्यक्रम राबविणे सोयीचे ठरेल. त्याचबरोबर पर्यटनविषयक साधनसंपत्तीचे स्रोत आणि त्यांची पर्यटनविकासक्षमता ह्यांचा समन्वय साधून संभाव्य गरजा भागविण्यासाठी परिप्रेक्ष्य नियोजनाचा विचार आवश्यक ठरतो. एका दशकापूर्वी खजुराहो हे एक अपरिचित असे खेडे होते परंतु आता ते जागतिक पर्यटन नकाशावर आले आहे. पर्यटनस्थळाचा विकास कसा करावयास हवा, त्याचे खजुराहो हे उत्कृष्ट उदाहरण आहे.

अधःसंरचनात्मक सुविधांच्या निर्मितीचा विचार करता, हा खरोखरच अवघड प्रश्न असल्याचे लक्षात येते. हा प्रश्न म्हणजे पदार्थ वा वस्तू आणि बाजारपेठ ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित आणण्याचा आहे. याचे क्षेत्र विमानतळावरील सुविधा, निवासव्यवस्था आणि अंतर्गत वाहतूक व संदेशवहन ह्यांभोवती गुंफलेले आहे.

भारतीय पर्यटन उद्योगाच्या विकासातील सर्वांत मोठा अडसर म्हणजे हॉटेलांचा तुटवडा (हॉटेल खोल्यांची अनुपलब्धता) हाच होय. कारण एका हॉटेल खोलीच्या योगे ३ प्रत्यक्ष, तर ९ अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतात. सरकारमान्य २८७ हॉटेलांमधील खोल्यांची संख्या गेल्या दहा वर्षांत ८,८०० वरून सु. १८,००० म्हणजे दुपटीहून जास्त झाली असली, तरी त्याच काळात विदेशी पर्यटकांची संख्या १,९०, ००० वरून ६,४०,००० (म्हणजे तिपटीहून अधिक) एवढी झाली आहे. शासनाने नियुक्त केलेल्या हॉटेल पुनर्विलोकन व सर्वेक्षण समितीच्या मते, १९८० च्या सुमारास भारतात येणाऱ्‍या १० लक्ष विदेशी पर्यटकांकरिता आणखी २८,००० हॉटेल-खोल्यांची गरज भासणार आहे. भारत सरकारनेही हॉटेल उद्योग हा अग्रक्रम उद्योग म्हणून घोषित केलेला आहे.

झेलमवरील शिकाऱ्‍यांतून दिसणारे चेतोहारी दृश्य
झेलमवरील शिकाऱ्‍यांतून दिसणारे चेतोहारी दृश्य

आपल्या देशातील हॉटेले, रेस्टॉरंट व अन्य पर्यटन सुविधा यांमध्ये विदेशी पर्यटकाला आकृष्ट करून घेणारी भारतीय वैशिष्ट्ये प्रकर्षाने प्रतिबिंबित झाली, तर भारतीय पर्यटनविकासाला अधिकाधिक चालना मिळावयास अडचण पडणार नाही. जपानमध्ये ह्या गोष्टींचा फार बारकाईने विचार व कार्यवाही केली जात असल्यामुळेच तो देश फार मोठ्या संख्येने विदेशी पर्यटकांना आपणाकडे आकृष्ट करण्यात कमालीचा यशस्वी झाला आहे. 

पर्यटनास अधिकाधिक चालना देण्याच्या कामी १ ऑक्टोबर १९६६ रोजी स्थापन करण्यात आलेला ‘भारतीय पर्यटन विकास निगम’ हा मोठ्या प्रमाणावर भरीव कार्य करीत आहे. पर्यटक आकृष्ट होऊ शकतील अशा प्राचीन, पुरातत्त्वीय स्थळांचा विकास करण्यात येत आहे नवीननवीन पर्यटन स्थळांचा शोध केला जात आहे यांमध्ये सागरतटीय आमोद-प्रमोदाची स्थळे, वन्य पशु-पक्षी यांची अभयारण्ये आणि शरदीय क्रीडास्थाने इत्यादींचा अंतर्भाव आहे.


पर्यटन आणि विकास

निसर्गाच्या सहवासात आनंदाचे क्षण घालविण्याची आणि नवनवीन कला, संस्कृतीविषयी जाणून घेण्याची माणसाची मुलभूत प्रवृत्ती पर्यटनाचा मूळ आधार आहे. धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाला तेवढेच महत्व आहे. आज वेगवान दळणवळणाच्या साधनाने जग जवळ आले असताना देशाबरोबरच बाहेरचे जग जाणून घेण्याच्या माणसाच्या ओढीने हे क्षेत्र सातत्याने विस्तारते आहे.

कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाची भूमिका महत्वाची आहे. म्हणूनच भविष्याचा वेध घेत या भूमिकेला अधिक महत्व प्राप्त व्हावे यासाठी संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संघटनेने यावर्षीच्या जागतिक पर्यटन दिनाला ‘शाश्वत पर्यटन-विकासाचे साधन’ असे घोषवाक्य निश्चित केले आहे.

जागतिक पर्यटन संघटना पर्यटनाला चालना देण्याच्यादृष्टीने या क्षेत्राच्या विविध पैलूंविषयी मार्गदर्शन करते तसेच पर्यटन विकासासाठी कार्य करते. भारतासह या संघटनेचे 155 सदस्य आहेत. स्पेनमधील टोरोमॉलीनोज येथे 1979 मध्ये झालेल्या जागतिक पर्यटन संघटनेच्या सभेत 1980 पासून पर्यटन दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरवर्षी पर्यटन दिनाच्या ‍निमित्ताने या क्षेत्राशी संबंधित विविध पैलूंवर चर्चा घडवून आणली जाते. वर्षभरासाठी एक संकल्पना निश्चित करून त्यानुसार कार्यक्रमांचे आयोजन जगभरात करण्यात येते. यापूर्वी सांस्कृतिक बंध, पर्यटन आणि जैवविविधता, महिलांसाठी संधी, पर्यावरण बदलास प्रतिसाद, क्रीडा आणि पर्यटन, खाजगी क्षेत्राचा सहभाग अशा विविध विषयांवर विचार करण्यात आला आहे. यावर्षी ‘पर्यटन आणि विकास’ हा संबंध अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

पर्यटन हा जगातील रसायने आणि इंधनानंतरचा तिसऱ्या क्रमांकाचा मोठा व्यवसाय आहे. जगभरातील अनेक नागरिकांसाठी उत्कर्षाचे साधन आणि जीवनाची आशा म्हणून या क्षेत्राचे मोठे योगदान आहे. पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारांवर अनेकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. वाहतूक, हॉटेल्स, मनोरंजन आदी व्यवसायही पर्यटनाशी जोडले गेले आहेत.

गतवर्षी 120 कोटी पर्यटकांनी जगभरातील विविध स्थांनांना भेटी दिल्या आहेत. ही संख्या 2030 पर्यंत 180 कोटींच्या घरात जाईल असा अंदाज जागतिक पर्यटन संघटनेने व्यक्त केला आहे. या संधीचा उपयोग करून शाश्वत विकासाला चालना देता येणे शक्य आहे. पर्यटनाचा यादृष्टीने विचार होणे आवश्यक आहे.

पर्यटन व्यवसायामुळे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरण विषयक विकास होण्याबरोबरच पर्यटनस्थळ परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवनमानातही बदल घडून येतो. पर्यटकाला आवश्यक असणारी निवास, भोजन, वाहतूक, माहिती, मनोरंजन आदी व्यवस्थेसोबतच त्या भागातील उत्पादनांदेखील मागणी निर्माण होते. सांस्कृतिक आदानप्रदानाच्या माध्यमातून नागरिकांना एकमेकाशी जोडण्याचे कामदेखील पर्यटनाच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे पर्यटन विकासात नागरिकांचा जेवढा सहभाग वाढेल, तेवढेच त्या भागातील अर्थकारणालादेखील गती मिळते.

पर्यटनाबाबत विकासाच्या कल्पना मांडतांना त्या भागातील खास खाद्यसंस्कृती, पारंपरिक कला, साहित्य, लोकजीवन, निसर्ग याचा फारसा विचार केला जात नाही. पर्यटकांसाठी चांगल्या सुविधांएवढेच त्यांना नव्या जगाचे दर्शन होणे आणि रोजच्या जीवनापेक्षा नवा अनुभव मिळणे महत्वाचे असते. पाश्चात्य राष्ट्रांनी आपल्या परंपरेच्या खुणा याचसाठी खासकरून जपल्या आहेत आणि त्याचेच मार्केटींग उत्तमरित्या केले जाते.

नाशिक जिल्ह्याचा विचार करता पावसाळी पर्यटन असो अथवा सांस्कृतिक, धार्मिक, ऐतिहासिक पर्यटन, नाशिकला पर्यटनाच्या मोठ्या संधी आहेत. नाशिक देशाची ‘वाईन कॅपिटल’ म्हणून ओळखली जाते. कृषि पर्यटनाबाबतही जिल्ह्यात खूप मोठी संधी आहे. राष्ट्रीय महामार्ग, रेल्वेमार्ग आणि मुंबईशी असलेली समिपता लक्षात घेता नाशिकला पर्यटन विकासाच्या अमर्याद संधी आहेत. या संधीचा उपयोग करून घेत जिल्ह्याच्या विकासालाही गती मिळू शकते.

पर्यटन दिनाच्या निमित्ताने पर्यटन क्षेत्राशी संबंधीत विविध घटकांनी विकासात्मक पैलूंवर चर्चा केल्यास भविष्यातील विकासाच्या वाटा दृष्टीक्षेपात येऊ शकतील. अर्थातच यासाठी पर्यटक केंद्रस्थानी असणे गरजेचे आहे. जागतिक पर्यटन संघटनेचे महासचिव तालेब रिफाई यांचा पर्यटकांना सुंदर संदेश आहे ‘निसर्ग, संस्कृती आणि यजमान यांचा सन्मान करा, तुम्ही अधिक चांगल्या विश्वाचे दूत बनू शकता’. ही भावना पर्यटकांपुरती मर्यादीत न राहता पर्यटनस्थळ परिसरातील नागरिकांनीदेखील स्वागत, सन्मान आणि सुविधा या तीन बाबी लक्षात घेतल्यास पर्यटनाच्या माध्यमातून अपेक्षित विकास शक्य आहे.


वेरूळची अक्षर लेणी, महाराष्ट्र: इंद्राणीचे शिल्प.
वेरूळची अक्षर लेणी, महाराष्ट्र: इंद्राणीचे शिल्प.
लुगमन येथील बुद्धमंदिरातील लोकपाल-द्वारपाल-मूर्ती, चीन.
लुगमन येथील बुद्धमंदिरातील लोकपाल-द्वारपाल-मूर्ती, चीन.
जगप्रसिद्ध खजुराहो, मध्य प्रदेश : लक्ष्मी-नारायण मूर्ती.
जगप्रसिद्ध खजुराहो, मध्य प्रदेश : लक्ष्मी-नारायण मूर्ती.
व्हर्सायच्या राजवाड्यातील शिल्पसुंदर कारंजे, फ्रान्स.
व्हर्सायच्या राजवाड्यातील शिल्पसुंदर कारंजे, फ्रान्स.
चितोडगढचा उत्तुंग कीर्तिस्तंभ, राजस्थान.
चितोडगढचा उत्तुंग कीर्तिस्तंभ, राजस्थान.
निसर्गरम्य आल्प्स परिसराचे विहंगम दर्शन घडविणारा केबलमार्ग, स्वित्झलंड.
निसर्गरम्य आल्प्स परिसराचे विहंगम दर्शन घडविणारा केबलमार्ग, स्वित्झलंड.
ओरिसातील विश्वविख्यात कोनारक मंदिराचे रथचक्र
ओरिसातील विश्वविख्यात कोनारक मंदिराचे रथचक्र

ताजमहाल, आग्रा, भारत.
ताजमहाल, आग्रा, भारत.
बद्रिनारायण मंदिर, बद्रीनाथ, भारत.
बद्रिनारायण मंदिर, बद्रीनाथ, भारत.
गंगाघाट, वाराणसी, भारत.
गंगाघाट, वाराणसी, भारत.
राजा-राणी संवादाचे दृश्य, लेणे क्र. १, अजिंठा, भारत.
राजा-राणी संवादाचे दृश्य, लेणे क्र. १, अजिंठा, भारत.
‘बटेरिया लूप’, दार्जिलिंग, भारत.
‘बटेरिया लूप’, दार्जिलिंग, भारत.
‘ओल्ड फेथफुल’ गायझर: यलोस्टोन नॅशनल पार्क, केंटकी, अमेरिका.
‘ओल्ड फेथफुल’ गायझर: यलोस्टोन नॅशनल पार्क, केंटकी, अमेरिका.
मुलांचा किल्ला, डिझ्नी लँड, ॲनाहीम, अमेरिका.
मुलांचा किल्ला, डिझ्नी लँड, ॲनाहीम, अमेरिका.
‘क्रिस्टल लेक’, मॅमथ केव्ह नॅशनल पार्क, केंटकी, अमेरिका.
‘क्रिस्टल लेक’, मॅमथ केव्ह नॅशनल पार्क, केंटकी, अमेरिका.
कपबश्यांच्या आकृतिबंधातील क्रीडांगण, डिझ्नी लँड, ॲनाहीम, अमेरिका.
कपबश्यांच्या आकृतिबंधातील क्रीडांगण, डिझ्नी लँड, ॲनाहीम, अमेरिका.


संदर्भ

  1. ^ Google's cache of http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=93596:2010-08-13-18-35-09&catid=26:2009-07-09-02-01-20&Itemid=3. Archived 2010-08-20 at the Wayback Machine.It is a snapshot of the page as it appeared on 19 Jan 2011 22:22:49 GMT.
  2. ^ http://www.virtualtourist.com/travel/Asia/India/State_of_Maharashtra/Mumbai-1101422/Tourist_Traps-Mumbai-BEWARE-BR-1.html Archived 2013-06-03 at the Wayback Machine. या गोष्टींचा पर्यटनावर विपरीत परिणाम होतो. संकेतस्थळ दिनांक १५ २ २०१११ रोजी भाप्रवे रात्रौ एक वाजता जसे दिसले.
  3. ^ "Haji ali". Mumbai Mirror. 2008-08-07. Archived from the original on 2007-10-24. 2008-08-17 रोजी पाहिले.

द्वारे -
प्राजक्ता अनिल टेमकर 
(बी. एड. प्रथम वर्ष २०२३-२४ )





Comments